आंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला

मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक  टपरी सापडलीच..... 

Updated: Dec 15, 2017, 06:07 PM IST
आंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक  टपरी सापडलीच..... 

मुंबईतला हा कटिंग चहा..... याच्याच जोरावर अख्खी मुंबई धावते.....मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली चहाचे अनेक टपरीवाले आहेत..... पण मुंबईतल्या टपरीवर बाई दिसणं तसं दुर्मीळ....... आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्तानं फेरफटका मारताना आम्हाला अशी एक टपरी सापडली....

मंगल निकम.. गेल्या दहा वर्षांपासून काळाचौकीत चहाची टपरी चालवतात.... त्यांचे सासरे चहाची टपरी चालवायचे...... नंतर त्यांचे पती टपरी चालवायचे..... पण एवढ्यावर संसाराचं गणित काही जुळत नव्हतं.... मग मंगल यांच्या नव-यानं दुसरी नोकरी शोधली आणि मंगल यांनी चहाची टपरी सांभाळली.....  सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी फारच कठीण गेले..... पण नंतर सवय झाली. 

घरी आजारी सासू,  पतीची वॉचमनची नोकरी आणि तीन मुलं अशा परिस्थितीत घरच्या आर्थिक खर्चाचा ताळमेळ बसवण्याची कसरत त्यांना करावी लागते. दिवसाला साधारणपणे दिवसाला दोनशे ते तीनशे कप चहाची विक्री होते.... त्यासाठी  दिवसाला 5 लीटर रॉकेल, दहा लीटर दूध, दोन किलो साखर, अर्धा किलो चहा पावडर आणि अर्धा किलो आलं त्यांना लागतं. घरभाडं आणि घरचा सारा खर्च जाऊन त्यांना महिन्याला जेमतेम तीन हजार रुपयांचा फायदा होतो. पण सध्या थंडीत असल्यानं व्यवसाय जरा तेजीत आहे.... थंडीच्या दिवसांत हाती जरा जास्त  पैसे येतात.... 

मंगल निकम यांना तीन मुलं आहेत. त्यातली मोठी मुलगी महाविद्यालयात अखेरच्या वर्षाला शिकते... तर दुसरी मुलगी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला आहे.... मुलगा सहा वर्षांचा आहे....दुसरी मुलगी शिक्षणाबरोबर आईला  टपरीवर मदतही करते.

रोज सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 वेळात त्या चहा विक्री करतात. त्यांच्या टपरीजवळ इतर चहाच्या टप-या नसल्यानं त्यांचा चहाला चांगली मागणी आहे. गेली अनेक वर्ष त्या इथं व्यवसाय करत असल्यानं त्यांचे काही हक्काचे ग्राहकही आहेत की जे केवळ इथं येऊनच चहा पितात.

चहाची टपरी ही तशी पुरुषांची मक्तेदारी.... पण मंगला निकम यांनी ती मोडीत काढलीय...... गेली दहा वर्षं त्यांचा व्यवसाय उत्तम सुरु आहे.