काय झालं सिंचन घोटाळ्याचं आणि तटकरे-अजित पवारांचं?

सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांना विशेषतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी करत होते.

Updated: Sep 14, 2017, 07:08 PM IST
काय झालं सिंचन घोटाळ्याचं आणि तटकरे-अजित पवारांचं?

दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई  : सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांना विशेषतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी करत होते. मात्र सत्ता येऊन ३ वर्ष झाली, तरी याप्रकरणी तटकरे अथवा अजित पवारांवर भाजपा सरकार कारवाई करू शकलेले नाही. सिंचन घोटाळ्यात या दोन नेत्यांचा सहभाग नाही, म्हणून ही कारवाई होऊ शकलेली नाही की भाजपाला राष्ट्रवादीची गरज असल्याने ही कारवाई होत नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपाने २०११-२०१२ पासूनच सुरू केला होता. यात भाजपाच्या टार्गेटवर प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे होते. या दोघांनी जलसंपदा खाते सांभाळले असल्यामुळे भाजपाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन नेत्यांना टार्गेट करणे सुरू केले. काही भाजपाच्या नेत्यांनी तर सत्ता आल्यावर या दोघांना जेलमध्ये टाकण्याची राणा भीमदेवी घोषणाही केली. मात्र भाजपाची सत्ता येऊन आता तीन वर्ष होतील सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपा ना अजित पवारांना हात लावू शकले नाही. 

कोंडाणे धरण प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने ७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले, या आरोपपत्रात तटकरे यांचे नाव असेल अशी जोरदार चर्चा होती, मात्र प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल झाले तेव्हा त्यात तटकरेंच्या नावाचा समावेश नव्हता. तटकरेंची चौकशी केली जाईल असं एसीबीने स्पष्ट केलं. 

मात्र भाजपा सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली तरी अजून सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याच्या वल्गना करणारे भाजपाचे नेते आता स्वतःहून पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. भाजपाचे सरकार २०१४ ला राज्यात सत्तेवर आले तेव्हा न मागता राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला, त्यानंतर वारंवार भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळीकतेबाबत चर्चा सुरू झाल्या. 

शिवसेनेने दगाफटका केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार तारून न्यायचे अशी भाजपाची रणनिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपा सरकार सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे याप्रकरणात खरे काय भाजपाची सत्ता टीकवण्याची अगतिकता खरी की राष्ट्रवादीचा दावा खरा असा प्रश्न राज्यातील सामान्य जनतेला पडलाय.