ले. कर्नल पुरोहितला या सुविधा मिळणार नाहीत!

मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्यावर नजर असणार असून त्याला अनेक सुविधा मिळणार नाहीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2017, 08:35 PM IST
ले. कर्नल पुरोहितला या सुविधा मिळणार नाहीत! title=

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्यावर नजर असणार असून त्याला अनेक सुविधा मिळणार नाहीत.

मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित याला जामीन मंजूर झाल्यावर त्याची आज तळोजा तुरुंगातून सुटका झाली. पुरोहितच्या सुटकेच्यावेळी त्यांचे कुटुंबिय सुद्धा तळोजा तुरुंगात उपस्थित होते.

दरम्यान, एडव्होकेट ब्रांच आर्मी,  सदन कमांडंट आर्मी आणि प्रशासन विभाग निलंबित कर्नल प्रसाद पुरोहीतच्या जामीन आदेशाचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर पुरोहितवरील आरोप अयोग्य असल्याचा शेरा दिल्यास ते रुटीन ऑफिसर म्हणून रुजू होणार. मात्र त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेईपर्यंत त्यांना लष्करी अधिकाऱ्याचे अधिकार बहाल करण्यात येणार नाहीत. 

पुरोहिताच्या हालचालीवर नजर असून त्यावर बंधने असतील. तो ओपन अरेस्ट असेल. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, मी लवकरच आर्मीचा पदभार स्विकारण्यासाठी उत्सुक आहे. माझी दोन कुटुंब आहेत एक लष्कर आणि माझे कुटुंब. यात माझी पत्नी, दोन मुले, बहीन आणि आई. त्यांना मिळण्यासाठी मी उत्सुक आहे.

 जामीन मिळाल्यानंतर सरंक्षण खात्याच्या व्याख्येनुसार ओपन अरेस्टमध्ये असलेला कर्नल प्रसाद पुरोहीतची सरंक्षण खात्यातली औपचारिकता आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून सरंक्षण खात्याचा गणवेश घालून पुरोहित पुन्हा सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सरंक्षण खात्याच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. तसंच आजच्या औपचारिका पूर्ण करण्यासाठी कर्नल पुरोहितला विशेष एनआयएच्या आजच्या सुनावणीला हजर न राहण्याची मुभा देण्यात आली होती.