जिरेटोप वाद चिघळणार? प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक

Jiretop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिरेटोप घालून स्वागत करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना चुकीचं गांभिर्य लक्षात आलेलं नाहीय. राज्यभरातून टीकेची झोड उठूनही ना पटेलांनी माफी मागितलीय ना दिलगिरी व्यक्त केलीय.. थातुरमातूर ट्विट करून पटेलांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यामुळे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

राजीव कासले | Updated: May 15, 2024, 08:06 PM IST
जिरेटोप वाद चिघळणार? प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक title=

Jiretop Controversy : वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठलीय. मात्र या चुकीचं गांभीर्य पटेलांना उमगलेलंच दिसत नाहीय. जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेल यांनी ना माफी मागितली, ना दिलीगिरी व्यक्त केली. यापुढे काळजी घेऊ असं तकलादू ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, असं मोघम ट्विट पटेलांनी केलं.

शिवप्रेमी संतापले
पटेलांच्या या ट्विटनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलीय. संभाजी ब्रिगेडनं तर आक्रमक भूमिका घेत वडू तुळापूरमध्ये आंदोलन केलं.  प्रफुल्ल पटेलांनी माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं (Sambhaji Brigad) केलीय. तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी पटेलांवर निशाणा साधला. यावर कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.

नेता असो की सामान्य माणूस, चूक होत असते. मात्र ती कबूल करून माफी मागणंही तितकंच महत्वाचं असतं. त्यात ती चूक शिवरायांबद्दल असेल तर माफी मागायला संकोच तो कसला. मात्र नेहमीच शह कटशहाचं आणि बेरजेचं राजकारण करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना त्यातलं गांभीर्य अजून समजलेलं दिसत नाहीय.

काय होता नेमका प्रकार
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.  पीएम यांच्याबरोबर अमित शहा यांच्यासह देशभरातील एनडीएचे प्रमुख नेते  उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पीएम मोदी यांचा जिरेटोप देऊन सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल हिंदू महासभेने (Hindu Mahsabha) केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. 

तर शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली आहे. जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही !रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे.... अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे, अशी टीका जगताप यांनी केलीय.