मराठा आंदोलन : सरकार राणे, उदयनराजे, संभाजीराजेंची घेणार मदत

मागील अनेक दिवस राज्यात मराठा आरक्षणावरून हिंसक आंदोलन सुरू

Updated: Jul 27, 2018, 09:20 AM IST
मराठा आंदोलन : सरकार राणे, उदयनराजे, संभाजीराजेंची घेणार मदत  title=

मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यभर पेटलेले आंदोलन शांत करण्यासाठी राज्य सरकार आता विविध पर्यायांवर विचार करतंय. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपतींची आंदोलन शमवण्यासाठी मदत घेतली जाणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळतेय.  

मागील अनेक दिवस राज्यात मराठा आरक्षणावरून हिंसक आंदोलन सुरू असताना ते थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, आता आंदोलन जास्त पेटू लागल्यानं राज्य सरकारने विविध घटकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे राज्य सरकारने सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची शनिवारी बैठक बोलवली आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील उदयनराजे आणि संभाजी राजे हे चर्चेला पुढे आले तर त्यांच्याशीही चर्चा करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांनी मराठा संघटनांशी चर्चा करावी अशी सूचना सरकारने त्यांना केली आहे. त्यामुळे आता सर्व स्तरावरून पेटलेले मराठा आंदोलन शांत करण्याचा सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारची धावपळ उडालेली स्पष्ट दिसतेय. पण सरकारने पावले उशिरा का उचललं? अशी चर्चा सुरू आहे.