Assembly Election Results 2017

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला ?

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 03:56 PM IST
 मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला ?

मुंबई : मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

शिवसेनेकडून नगरसेवक खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रच भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. त्यातच मनसेचे काही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
 मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकचा फरक आहे. भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत. त्यामुळं मनसेच्या नगरसेवकांना फोडून, सत्ता टिकवण्याचा आटापिटा शिवसेनेनं सुरू केल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.