अंधेरीत आढळला प्राध्यापिकेचा कुजलेला मृतदेह

 या महिलेचा मृत्यु झाल्यानंतर मृतदेह अनेक दिवसांपासून बंद खोलीत असल्यामुळे फुगला होता. 

Updated: Apr 12, 2018, 08:40 PM IST

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आठवड्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, पण याची माहिती ना तिच्या नातेवाईकांना होती, ना शेजारच्यांना... आठवडाभरानं जेव्हा तिच्या फ्लॅटमधला उग्र वास असह्य झाला, त्यावेळी पोलीस आले... आणि एका आठवड्याभरापूर्वीच्या मृत्यूचा उलगडा झाला... मनिषा भावे यांच्या या मृत्यूच्या निमित्तानं एकाकीपणाच्या बळींचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं.

गजबजलेल्या मुंबईत गेलेला एकाकीपणाचा बळी... मनिषा भावे... अंधेरी पूर्वेच्या तेली गल्लीतल्या गौरेश अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहायच्या... नवऱ्याशी घटस्फोट झाल्यानंतर गेल्या दहा बारा वर्षांपासून त्या इथे राहात होत्या... पण त्यांचं शेजा-या पाजा-यांशी जास्त बोलणं नव्हतं... अगदीच काम असेल तर त्या बोलायच्या... मनिषा भावे या साठे महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या... सकाळी कॉलेजल्या गेल्या की संध्याकाळीच घरी यायच्या... त्यामुळे शेजाऱ्यांनाही त्यांच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती.

दोन-तीन दिवसांपासून भावे यांच्या घरातून दुर्गंधी येत होती, पण शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर बुधवारी सकाळी हा उग्र वास असह्य झाल्यानं शेजाऱ्यांनी भावे यांच्या भावाचा नंबर मिळवून त्यांच्या भावाशी आणि पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडल्यानंतर मनिषा भावे यांचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत मिळाला.

मनिषा भावे विलेपार्ल्याच्या साठ्ये कॉलेजमध्ये 4 एप्रिलला गेल्या होत्या. त्यानंतर 5 एप्रिलपासून कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. मनिषा भावे यांचा मृत्यू चार ते पाच एप्रिल दरम्यान झाल्याचा अंदाज आहे. म्हणजे आठवडाभरापूर्वी मनिषा यांचा मृत्यू होऊनही तो कुणाला समजलाच नाही.... आठवडाभर घरात मृतदेह पडलेला असूनही कुणाला कळलंच नाही. 

मनिषा भावे यांचे भाऊ मिलिंद भावे यांनी याबद्दल काही बोलायला नकार दिलाय. या निमित्तानं एकट्या दुकट्यानं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय... आणि मृत्यूच्या वेळीही आपलं असं कुणीच जवळ नाही, हेही मोठं दुर्दैवच.