पोलिसांनी साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस

तक्रारदार म्हणाले, आज माझा वाढदिवस आहे, आणि माझा सर्व दिवस आज पोलीस स्टेशनलाच जाणार की काय

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2017, 06:59 PM IST
पोलिसांनी साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस title=

मुंबई : आरोपी किंवा तक्रारदार म्हणून कुणालाही पोलीस स्टेशनमध्ये जायला आवडत नाही. समोर बसलेले पीएसआय एक एकाची तक्रार ऐकून घेत असतात, ती लिहून घेता येईल किंवा नाही याविषयी तक्रारदाराला सांगत असतात. आपसात समाधान होईल यावर भर असतो.

रात्रपाळी आणि दिवसपाळीही वेळेवर न संपणारे, पीएसआय नवीन तक्रारदार दिसला आणि तक्रार घेणे अटळ आहे, हे लक्षात आलं तर मनातल्या मनात का असेना कधी संपणार आजची ड्यूटी असा प्रश्न विचारत असतात.

हवालदार भुवया उंचावून डोळ्याने खूण करून विचारतात, काय तक्रार आहे. यात अचानक मध्येच साध्या वेशातील पोलीस दोन-चार सराईत आरोपींना पकडून आणतात, बस रे बस खाली बस, जायचं नाही आता बाहेर विचारल्याशिवाय, असं सांगत आरोपींच्या अटकेची तयारी करत असतात.

यात तक्रारींचा पाऊस, तथ्य असलेल्या तक्रारी कमी, यात तपास कधी होणार, आणि तुम्हाला न्याय कधी मिळणार सर्वंच दिरंगाईचं वाटतं. नाईलाजाने पोलीस कामाचा रेटा पूर्ण करत असतात.

अशा वातावरणात जेव्हा वाढदिवस साजरा होतो , तो देखील तक्रारदाराचा

हे वातावरण सर्वच पोलीस स्टेशनमध्ये असतं, मुंबईतल्या अनिश जैन यांच्या कारला एका टेम्पोने धडक दिली, आता विमा कंपनीकडून रक्कम मिळाली म्हणून त्यांना रितसर तक्रार देणे भाग होते.

 टेम्पो चालकासह ते पोलीस स्टेशनला आले, यात पंचनामा आणि तक्रार लिहून घेण्यास दोन तास गेले, त्यावर तक्रारदार म्हणाले, आज माझा वाढदिवस आहे, आणि माझा सर्व दिवस आज पोलीस स्टेशनलाच जाणार की काय, तेव्हा पोलिसांनी पेढे मागवून, अनिश जैन यांना पेढे भरवून, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला.