मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!

मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही. 

Updated: Apr 4, 2018, 10:53 PM IST
मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!

देवेंद्र कोल्हटकर / गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही. 

मुंबई विद्यापीठ... देशातल्या आद्य विद्यापीठांपैकी एक... देशातच नाही तर जगात या विद्यापीठाची वेगळी ओळख आणि दबदबाही... मात्र गेल्या काही वर्षात कुलगुरू निवड ते निकाल प्रक्रिया या सगळ्याच घटकात सातत्याने गडबड होतेय. वाद, अनियमीतता होतेय. याचा परिणाम काय तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विद्यापीठांच्या यादीत पहिल्या दीडशेतही मुंबई विद्यापीठ नाही. मुंबई विद्यापीठाच्या घसरणीची अनेक कारणं आहेत.  

मुंबई विद्यापीठाचं 'नॅक अॅक्रिडीशन' दोन वर्षांपासून झालं नाही. विद्यापीठातील प्रमुख पदावर प्रभारी नियुक्त्या झाल्या आहेत. ऑनलाईन असेसमेंट गोंधळाने जगात नाव खराब झालं. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात ३० ते ४० टक्के जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत. विद्यापीठ कायद्याची उशीरा अंमलबजावणी झाल्यामुळे विविध प्राधीकरणं अस्तित्वात नव्हती. स्वायत्त कॉलेजेस आणि खासगी विद्यापीठांच्या वाढत्या संख्येचाही फटका बसला. 

मनुष्यबळ विकासमंत्रालयातर्फे तिस-यांदा ही यादी जाहीर करण्यात आलीय. तिनही वेळी मुंबई विद्यापीठाच्या पदरी निराशाच पडली. याची जबाबदारी विद्यमान राज्यपाल आणि राज्य सरकारची असल्याचा आरोप माजी प्र कुलगुरू अरूण सावंत यांनी केलाय. 

पहिल्या १५० विद्यापीठांच्या यादीतही स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केलीय. 

एकीकडे खाजगी कॉलेजं आणि विद्यापीठं आपली गुणवता सिद्ध करत असताना मुंबई विद्यापीठाची अशी घसरण होणं चिंताजनक आहे. शैक्षणिक दर्जा घसरला याचाच अर्थ लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यामुळे तातडीने सुधारणा गरजेच्या आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close