माझ्या वाटेला येतील तर, त्यांना पुरुन उरेन - नारायण राणे

माझ्या वाटेला येतील तर यांना पुरून उरेन, असा थेट इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलाय. 

Updated: Jun 7, 2018, 11:34 PM IST
माझ्या वाटेला येतील तर, त्यांना पुरुन उरेन - नारायण राणे title=

मुंबई : मी कुठेही गेलेलो नाही. स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. आता आपल्याला मुंबईपासून पक्ष बांधणी करायची आहे. भावनेवर मराठी माणसाला झुलवत ठेवलं आहे. माझ्या वाटेला येतील तर यांना पुरून उरेन, असा थेट इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलाय. त्याचवेळी सेनेला जोरदार चिमटा काढला. स्वबळाची भाषा करता, मग सत्तेतून बाहेर का पडत नाही. सत्तेत राहायचे आणि मित्र पक्षावर टीका करायची. स्वबळावर लढण्याची घोषणा करायची हे शिवसेनेला शोभत नाही, अशी टीका राणे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मुंबई विभागीय मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केला होता. या मेळाव्यात राणे बोलत होते. सध्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. परंतु त्याकडे लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही. सामान्य माणूस भरडला जात आहे. कोणताही पक्ष महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष देत नसल्यामुळे मला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करावी लागली, असे राणे म्हणालेत.

शिवसेनेवर बोचरी टीका

मराठी माणसासाठी शिवसेना होती तर मराठी माणसाचा मुंबईतील टक्का कमी कसा झाला. मराठी माणसाने शिवसेनेला सगळं दिलं, पण शिवसेनेनं मराठी माणसाला काय दिलं, असा सवाल राणे यांनी शिवसेनेला विचारलाय. आम्ही एकटे लढणार, मग सरकारमध्ये तंगड्यात तंगडे घालून का आहात. सरकारची सगळी जबाबदारी अर्थात भाजपाची. मग यांची फक्त खायची का जबाबदारी, असा हल्लाबोल शिवसेनेवर राणे यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईची काय अवस्था झाली आहे, ती आपण पहात आहोत. पहिलाच पाऊस पडला, तर मुंबईत जागोजागी पाणी तुंबल्याचे पहायला मिळाले. यांच्या भ्रष्टाचाराने पाणी तुंबले आणि खापर मात्र सरकार फोडत आहेत. म्हणे, सरकारमुळे मुंबई तुंबली. आता जे पक्षप्रमुख आहेत ते १९९९ साली उगवले. आयत्या बळावर नागोबा झालेत. शिवसेनेत आम्ही वडापाव खाऊन दिवस काढले. शिवसेना वाढवणारे आज पक्षात नाहीत, असे राणे म्हणालेत.

काँग्रेसवर जोरदार टीका

यावेळी राणे यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेसने जे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. ज्यांना महाराष्ट्राची काही माहिती नाही, त्यांच्याकडे राज्याचा कारभार दिला आणि त्यांनी सत्ता घालविली. वारंवार केवळ आश्वासने मिळू लागल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही शिवसेनेसह सर्वच पक्षांकडून मला ऑफर होती. मात्र आता आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला स्वत:चा पक्ष स्थापन करावा लागेल, असे वाटले. त्यातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जन्म झाला असल्याचे राणे यांनी सांगितले.

राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दरम्यान, आता आपल्याला मुंबईपासून पक्ष बांधणी करायची आहे. कर्नाटक, युपीमधील निवडणूक पाहिली. याचा अभ्यास आपण केला पाहिजे. पराभूत झालेला पक्ष का पराभूत झाला ते अभ्यासले पाहिजे. २०१९ च्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मुंबईतील कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागावे आणि निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.

मुंबई अध्यक्षाची निवड जाहीर

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात मुंबईच्या अध्यक्षपदी राजेश हाटले यांची नियुक्ती करीत असल्याची घोषणा नारायण राणे यांनी केली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राजेश हाटले यांनी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे. जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतील, राणेसाहेब त्यांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला.