विजय माल्ल्याला चोर म्हणणं चुकीचं - गडकरी

भाजपच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

Updated: Dec 14, 2018, 07:51 AM IST
विजय माल्ल्याला चोर म्हणणं चुकीचं - गडकरी  title=

मुंबई : आर्थिक घोटाळा आणि साधारण नऊ हजार कोटींच्या मनी लॉंड्रींग प्रकरणातील दोषी व्यावसायिक विजय माल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. त्याच्या भारतात येण्याने कर्ज बुडलेल्या बॅंक सुटकेचा निश्वास टाकणार आहेत. कर्ज बुडव्या माल्ल्याला भारतात आणू असे आश्वासन भाजपने दिले आहे. त्यामुळे माल्ल्या प्रकरण भाजपासाठी ही प्रतिष्ठेटे बनले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रकरणी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.  लिकर किंग विजय माल्ल्यानं एखादं कर्ज थकवलं, तर त्याला चोर म्हणणं चूकीचं असल्याचं  मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केले आहे. एखादा हफ्ता चुकवला तर विजय माल्ल्या फ्रॉड कसा झाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रश्नामुळे भाजपच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

'तो फ्रॉड कसा ?'

'40 वर्षं विजय माल्या सलग हफ्ते भरत होता, त्याचे व्याजही देत होता. 40 वर्षांनंतर तो एव्हिएशनमध्ये आल्यानंतर त्याच्या अडचणी सुरू झाल्या. अडचणीत आला म्हणजे काय लगेच चोर झाला का? जो पन्नास वर्ष नियमित व्याज भरत आलाय तोपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर एकदा माल्ल्याने ते चुकवलं, तर लगेच तो फ्रॉड कसा झाला? त्यामुळे ही मानसिकता काही बरोबर नसल्याचे'   गडकरींनी म्हटले आहे. 

'मी कोणाचे पैसे चोरले नाहीत'

मी कोणाचेही पैसे चोरलेले नाहीत. भारतीय बँकांना कर्जफेडीच्या प्रस्तावाबाबत मी कोणत्याही भुलथापा दिल्या नव्हत्या, असा दावा मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केला. मल्ल्याने सोमवारी लंडनच्या वेस्टमिनिस्टर न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मल्याने म्हटले की, मी कोणाचेही पैसे चोरलेले नाहीत.

मी कर्नाटक उच्च न्यायालयात कर्ज परतफेडीसाठीचा सुधारित विनंती अर्ज दाखल केला होता. यावेळी प्रसारमाध्यमांनी कर्ज परतफेडीचा हा प्रस्ताव कितपत खरा होता, असा प्रश्नही मल्ल्याला विचारला.

त्यावर मल्ल्याने म्हटले की, खरं किंवा खोटं असं काहीही नसतं. मी न्यायालयात कर्ज परतफेडीचा प्रस्ताव सादर केला होता, हे लक्षात घ्या. कोणीही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करु शकत नाही, असे मल्ल्या याने सांगितले.