विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय, कुणाची मतं फुटली?

विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत... 

Updated: Dec 7, 2017, 09:46 PM IST
विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय, कुणाची मतं फुटली? title=

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत... 

भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ मतं मिळाली... तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना केवळ ७३ मतांवर समाधान मानावं लागलं.

काँग्रेस - राष्ट्रवादीची मतं फुटली

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची तब्बल १५ मतं फुटल्याची चर्चा आहे. विरोधकांकडं काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४०, शेकाप ३, समाजवादी पक्ष १, माकप १, भारिप १ अशी ८८ मते होती. मात्र, मानेंना केवळ ७३ मते मिळाली. याचाच अर्थ संख्याबळापेक्षा त्यांना १५ मतं कमी पडली.

लाड यांना अपेक्षेहून जास्त मतं

याउलट सत्ताधाऱ्यांकडं भाजपाची १२२, शिवसेनेची ६२, बहुजन विकास आघाडी ३ आणि अपक्ष ७ अशी १९४ मतं होती. मात्र, लाड यांना २०९ मतं मिळाली

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीहून अधिक मतं

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला २०८ मतं मिळाली होती. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपनं आणखी एक जादा मत मिळवलंय... 

आज झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या दोन आमदारांनी बहिष्कार टाकला... तर तुरूंगवासात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि न्यायालयानं आमदारकी रद्द केलेले शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी मतदान केलं नाही.

सेनेचा पोलिंग एजंट

एकतर्फी ठरलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये एक वेगळीच गंमत बघायला मिळाली. पोलिंग एजंट म्हणून चक्क शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर त्या ठिकाणी बसले होते. यामुळे भाजप - सेनेच्या आमदारांवर त्यांच्या नेतृत्वाचा किंवा दुस-या पक्षाबाबत विश्वास नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.