धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : ही हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार - संजय राऊत

धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी विरोधकांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केलाय. 

Updated: Jan 29, 2018, 03:41 PM IST
धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : ही हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार - संजय राऊत title=

मुंबई : धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी विरोधकांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केलाय. 

हा राज्य सरकारला कलंक

‘ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला हा कलंक लावणारा प्रकार असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. 

सरकारला ऎकू येत नाही

ते म्हणाले की, ‘शेतक-यांच्या आक्रोशानेही सरकारला ऐकू येत नाही. शेतक-यांच्या रक्तावर वीट रचू देणार नाही, ही भूमिका समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेने मांडली. विकास हवाय, पण शेतक-यांचे असे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील असा विकास नकोय. ३ वर्षात ३ हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एजंटगिरी रोखण्यात सरकार असमर्थ ठरलंय’, असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यु झालाय. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पाय-या झिजवणा-या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, त्याचबरोबर जोपर्यंत त्यांना शहीद भूमिपुत्र शेतकरी असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय.