शिवसेनेचा आज दसरा मेळावा, उद्धव ठाकरे करणार महत्त्वाची घोषणा

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय.

Updated: Oct 18, 2018, 08:34 AM IST
शिवसेनेचा आज दसरा मेळावा, उद्धव ठाकरे करणार महत्त्वाची घोषणा  title=

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत शिवसेनेच्या आगामी वर्षाची वाटचाल, धोरण याविषयी पक्षप्रमुख संबोधित करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दसरा मेळावा आणि शिवसैनिक हे अतूट नातं शिवाजी पार्कवर वर्षानुवर्ष पाहायला मिळायचं. आजही उद्धव ठाकरेचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर गर्दी करतील.

भाजपा निशाण्यावर

आगामी 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा केंद्रीत असेल. मागच्या काळात भाजपा सरकारला शिवसेनेनं निशाण्यावर धरलंय.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, रुपयाची घसरलेली किंमत, नुकतेच सुरू असलेले एमजे अकबर प्रकरण याप्रकरणावर उद्धव ठाकरे बोलतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

आगामी निवडणुकीत शिवसेना सुरतमध्ये भाजपाशी युती करणार नसल्याचा निर्णय सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारी बैठकीत झाला होता. दुसरीकडे पक्षप्रमुख येत्या नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौरा करणार असून तारखेची घोषणाही करु शकतात.

या दौऱ्यादरम्यान अयोध्येत एका रॅलीलाही ते संबोधित करणार असून या दौऱ्यावरही सर्वांचे लक्ष आहे. अयोध्येप्रकरणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजपाला कोंडीत प्रकरणाच्या तयारीत आहे.

भव्य फलकबाजी

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा २०१९च्या निवडणुकांआधी मेळावा असल्याने याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय.

त्यामुळे वातावरणनिर्मिती करण्यासाठी फलक जोरात आहे. दादरच्या शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन परिसरात भव्य फलकबाजी करण्यात आलीय.

या पोस्टरवर रामाचे चित्र असल्याने या दसरा मेळाव्यात अयोध्या विषय असणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. या मेळाव्याची तयारीही अंतिम टप्प्यात आलीय.

एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी 

दरम्यान यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री-नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. नुकतीच, मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा व्यवस्थापनाबाबत चर्चा केल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन जागेची पाहाणी केली.

यंदाचा दसरा मेळावा लोकसभा निवडणुकीआधी होत असल्यानं त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय.