एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारने घेतला मोठा निर्णय

लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय

Updated: Dec 6, 2018, 09:22 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केली. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावरील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार, चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपीक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. 

या निर्णयामुळे महामंडळातील शिक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असून त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. प्रथम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पात्रता असूनही त्यांना लिपिक पदासाठी किंवा टंकलेखक पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या या घोषणेमुळे या युवकांना आता नव्याने ही संधी चालून आली आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close