नाना पाटेकर यांना अटक करा, तनुश्री दत्ताची मागणी

अभिनेता नाना पाटेकर प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मुंबई पोलिसांना नवं पत्र पाठवले आहे. 

Updated: Oct 13, 2018, 10:44 PM IST
नाना पाटेकर यांना अटक करा, तनुश्री दत्ताची मागणी title=

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करणारं नवं पत्र अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मुंबई पोलिसांना पाठवले आहे. नाना पाटेकर यांची ब्रेन मॅपिंग, नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी करावी, अशी तिची मागणी आहे. नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, निर्माता समी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांचीही ब्रेन मॅपिंग, नार्को अॅनलिसीस आणि लाय डिटेक्टर चाचणी करावी, अशी मागणी तनुश्रीनं केलीय. तनुश्रीनं नाना पाटेकरांविरोधात ११ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तनुश्रीनं नव्यानं मुंबई पोलिसांना हे पत्र पाठवलंय. 

तनुश्रीने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडेही (सिन्टा) नव्याने तक्रार दाखल केली आहे.  २००८ मध्ये केलेल्या तक्रारीची पुन्हा चौकशी करण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरची प्रतही या तक्रारीला जोडण्यात आली आहे. 

 २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात नुकताच नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे नाना यांनीही सर्व आरोप फेटाळून तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे.