उद्धव ठाकरेंचा असाही यूटर्न, एका न झालेल्या भेटीचा घटनाक्रम !

शिवसेना आमदारांवर निधी वाटपात अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात 5 वाजता भेट घेणार होते.

Updated: Mar 28, 2018, 09:00 PM IST
उद्धव ठाकरेंचा असाही यूटर्न, एका न झालेल्या भेटीचा घटनाक्रम ! title=

मुंबई : शिवसेना आमदारांवर निधी वाटपात अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात 5 वाजता भेट घेणार होते.

शिवसेना नेत्यांची चुळबूळ

आज अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. तरी ही भेट पूर्व नियोजित होती. त्यानुसार भेटीची वेळ जवळ येताच विधान भवन परिसरात शिवसेना आमदार आणि मंत्र्याची चुळबूळ सुरु झाली होती.

शिवसेना आमदारांची जय्यत तयारी

शिवसेना आमदार-मंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सायंकाळी साडे चार वाजल्या पासून सज्ज होते, तर प्रसारमाध्यमंही बातमीसाठी तयार होती.

भाजप आमदार आणि मुख्यमंत्रयांचे सध्याचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी उद्धव यांना मुख्यमंत्री दालनात नेण्याची व्यवस्था स्वतःकडे ठेवली होती. ते परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून होते.

नारायण राणेही विधानभवनात

त्याच वेळी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार  नारायण राणे विधानभवनात मुख्यमंत्री भेटीसाठी अचानक दाखल झाले. राणेंच्या आगमनाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

शिवालयात आले उद्धव

दरम्यान घड्याळाचे काटे सरकत होते आणि वेळही पुढे जात होता. मुख्यमंत्री महोदय सभागृहाच्या कामात व्यस्त होते. एव्हाना उद्धव मंत्रालयासमोरील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे येऊन उद्धव थांबले होते.

मुख्यमंत्रयांच्या सभागृहातील कामाचा सुमारे 4 ते पाच वेळा पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अंदाजही घेतला. अगदी सायंकाळी 7:30 च्या सुमारास कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाच्या मुख्य द्वारावर उद्धव यांच्या स्वागतासाठी येऊन उभे राहिले. सोबत पक्षाचे काही आमदारही होते.

उद्धव ठाकरेंचा यूटर्न

पण, मुख्यमंत्र्यांना सभागृह कामकाजात आणखी वेळ लागणार आहे हे लक्षात येताच उद्धव पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण देत माघारी परतले. आणि मुख्यमंत्री आणि उद्धव यांच्यातली आजची पूर्वनियोजित भेट रद्द झाली.

शिवसेना नेत्यांचा हिरमोड 

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचा झालेला हिरमोड त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. पण काही वेळातच नारायण राणे मुख्यमंत्र्याना भेटून विधान भवनातून बाहेर पडले. राणे यांच्या देहबोली बरंच काही सांगत होती.  त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं.