शिवसेनेचा अजूनही भाजपवर 'विश्वास'! टीडीपी खासदारांची भेट नाकारली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

Updated: Jul 15, 2018, 09:26 PM IST
शिवसेनेचा अजूनही भाजपवर 'विश्वास'! टीडीपी खासदारांची भेट नाकारली title=

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष(टीडीपी) मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची रणनिती आखत आहे. यासाठी टीडीपीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याचा कार्यक्रम ठरवला होता. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीडीपी नेत्यांची भेट नाकारली. त्यामुळे टीडीपीच्या रणनितीला सुरुवातीलाच धक्का लागला आहे. टीडीपी खासदार थोटा नरसिम्हन आणि पी. रविंद्र बाबू यांनी रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ मागितली होती. या भेटीमध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या टीडीपीच्या मागणीबाबात उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात येणार होती. पण उद्धव ठाकरेंनी या नेत्यांना भेट दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडून भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जवळपास रोजच टीका केली जाते. त्यामुळे शिवसेनेची सोबत आपल्याला मिळेल असं टीडीपीला वाटत होतं. यावर्षी मार्चमध्ये टीडीपी एनडीएमधून बाहेर पडली होती.

संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत होणार आहे. या अधिवेशनात टीडीपी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता टीडीपीसाठी हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.