'बॉयफ्रेंड आहे याचा अर्थ मुलींवर लैंगिक अत्याचार करावा असा नाही'

एखाद्या मुलीस प्रियकर असेल तर, याचा अर्थ इतर व्यक्तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार करावा असा होत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात बलात्कारी व्यक्तीला चपराक लगावली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 26, 2017, 09:42 AM IST
'बॉयफ्रेंड आहे याचा अर्थ मुलींवर लैंगिक अत्याचार करावा असा नाही' title=

मुंबई : एखाद्या मुलीस प्रियकर असेल तर, याचा अर्थ इतर व्यक्तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार करावा असा होत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात बलात्कारी व्यक्तीला चपराक लगावली.

न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावली. नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा या प्रकरणातील आरोपीवर आरोप होता. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पास्को) खटला सुरू होता. या वेळी न्यायालयाने आरोपीचे सर्व युक्तिवाद आणि दावे फेटाळून लावत शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावल्यार आरोपीने न्यायालयाकडे जामीन मागीतला.

न्यायालयाकडे जामीन मागताना आरोपीने आपण घरातील एकमेव कमावती व्यक्ती असून, कुटुंबाचा भार आपल्यवर आहे. तसेच, आपण कोणताही गुन्हा केला नाही. उलट संबंधीत मुलीचे एक नव्हे तर, चक्क दोन प्रियकर होते. त्यांच्याशी ती लैंगिक संबंधही ठेवत असे. तसेच, आपण केलेल्या अत्याचाराबाबत तिने पोलिसांकडेही कधी तक्रार केली नाही. तिच्या घरातल्यांकडेही त्याबाबत ती बोलली नाही. याऊलट ती आपल्याकडे आश्रयाला आली, हे सर्व विचारात घेता, आपण तिच्यावर बलात्कार केला नाही, हेच सिद्ध होते, असा दावा आरोपीने याचिकेत केला होता.

दरम्यान, आरोपीने केलेले सर्व दावे आणि युक्तिवादावर विचार करून न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली.  हा निर्णय देताना न्यायालयाने 'एखाद्या मुलीचा प्रियकर आहे, असे मान्य केले तरी अन्य पुरुषाला तिच्यावर लैंगिक वा कुठल्याही प्रकारचा अत्याचार करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. प्रत्येक स्त्रीला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट मत नोंदवले. तसेच, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे, त्यामुळे घरातील एकमेव कमवता या कारणासाठी त्याला जामीन देता येणार नसल्याचेही न्यायालयाने म्हटले.