२७ वर्षीय 'बाईक रेसर' चेतना पंडित हिची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले 

Updated: Jul 11, 2018, 03:39 PM IST
२७ वर्षीय 'बाईक रेसर' चेतना पंडित हिची आत्महत्या

मुंबई : बाईक रेसर, महिला बाईक कोच आणि 'रॉयल एनफिल्ड'च्या रोड कॅप्टन चेतना नागेश पंडित या मंगळवारी उशिरा आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. गोरेगाव इथल्या पद्मावती नगरमधील एका अपार्टमेंटमधल्या रुममध्ये फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. चेतना पंडित या अवघ्या २७ वर्षांच्या होत्या. 

प्रेमप्रकरणात दुखावल्या गेल्यानंतर चेतनानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडलीय. 'माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे' असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर चेतना खुपच दुखावली गेली होती आणि नैराश्येत होती, असं तिच्या मैत्रिणींनी म्हटलंय. 


चेतना पंडित

 चेतना आणखीन दोन मुलींसह भाड्याच्या घरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून राहत होती. घटना घडली तेव्हा रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रुममेट घरी परतल्यानंतर वारंवार दरवाजावरची बेल वाजवूनही आतून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला... तेव्हा त्यांना चेतनाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

चेतना मूळची कर्नाटकातल्या शिमोगाची... तिला केवळ एक छोटा आहे, एवढंच तिच्या मैत्रिणींना माहीत आहे. मात्र, चेतनाच्या आई-वडिलांबद्दल सगळेच अनभिज्ञ आहेत. याअगोदर तिनं 'डर्ट बाईक रायडर' म्हणूनही काम केलं होतं.