प्रियांका राजकारणात सक्रीय

काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

Updated: Jan 17, 2012, 03:34 PM IST

www.24taas.com , रायबरेली

 

काँग्रेसचे सरचिटणीस  राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

अमेठी आणि रायबरेली लोकसभा निवडणूक क्षेत्रात १० विधानसभेच्या जागांत सहापैकी एक जागा कॉंग्रेसची आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ८ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तर सात टप्प्यांचे मतदान ३ मार्चला होणार आहे. ८ मार्चला मतमोजणी होणार आहे.

 

पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रचारास सुरुवात केली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात असून, सोनिया गांधी यांची उत्तराखंडमध्ये प्रचारसभा होणार आहे.

 

काँग्रेस पक्षाने स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार द्यावेत, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीच सोमवारी प्रियांका गांधी यांचा ताफा अडविला होता. यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल यांच्या अमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात प्रचार केला होता.

 

विशेष विमानाने प्रियांका आज दुपारी फुरसतगंज येथे दाखल झाल्या. त्यानंतर त्या लगेचच मुशीगंज येथील एका खासगी गेस्ट हाउसकडे रवाना झाल्या. हे गेस्ट हाऊस राजीव गांधी फाउंडेशनकडून चालविल्या जात असलेल्या संजय गांधी रुग्णालयाचे आहे.

 

मुशीगंज गेस्ट हाऊसवर स्थानिक कॉंग्रेस नेते, तसेच पक्षाच्या उमेदवारांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम प्रियांका करणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांना या ठिकाणांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

 

दरम्यान,  प्रचारात सक्रिय होण्याचे त्यांचे कोणतेही नियोजन नाही, अशी माहिती कॉंग्रेससूत्रांनी दिली. प्रियांका यांनी प्रचारासाठी यावे, असा पक्षनेते आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्याची दखल घेऊन त्या प्रचारात उतरणार असल्याचे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रिटा बहुगुणा जोशी यांनी सांगितले.