ठाण्यात 'काँटे की टक्कर'!

ठाण्यात पदवीधर मंतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. विजय आमचाच होईल, असे दावे युती आणि आघाडीनं केलेत. पण आघाडी आणि युतीमधली अंतर्गत आव्हानं लक्षात घेता, ही निवडणूक कुणासाठीही नक्कीच सोपी नाही.

Updated: May 22, 2012, 08:18 AM IST

कपिल राऊत www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. विजय आमचाच होईल, असे दावे युती आणि आघाडीनं केलेत. पण आघाडी आणि युतीमधली अंतर्गत आव्हानं लक्षात घेता, ही निवडणूक कुणासाठीही नक्कीच सोपी नाही.

 

नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर आता सगळ्यांचं लक्ष पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांकडे लागलंय. आघाडीकडून वसंत डावखऱेंचा मुलगा निरंजन डावखरे यांना तिकीट देण्यात आलंय. पण डावखरेंचे पक्षांतर्गत शत्रू जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे निरंजन डावखरेंना या निवडणुकीत मदत करतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं असलं तरी सध्या तरी आघाडीचाच विजय होईल, असा दावा निरंजन डावखरेंनी केलाय.

 

दुसरीकडे भाजपच्या संजय केळकरांना तिकीट मिळालंय. त्यांनीही विजयाचा दावा केलाय. पण डावखरे आणि शिवसेनेची मैत्री लक्षात घेता, शिवसेना मित्रधर्म पाळणार की युती धर्माला जागणार, याचे पत्ते अजून खुले झालेले नाहीत. भाजपसाठीही रत्नागिरीचे बाळ माने ही डोकेदुखी ठरु शकते. तर दुसरीकडे गेल्या वेळचे आघाडीचे उमेदवार निलेश चव्हाण यांनी प्रचंड संख्येनं नोंदणी करुनसुद्धा त्यांना डावलल्यानं, आघाडीला त्यांची नाराजीही दुर्लक्षित करुन चालणार नाही. त्याशिवाय युती आणि आघाडीत अंतर्गत आव्हानं असतानाच मनसे फॅक्टरलाही कमी लेखणं परवडणारं नाही. त्यामुळे ठाण्याच्या या निवडणुकीत चांगलेच रंग भरले जाणार आहेत.