आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी

अमरावतीमधल्या 'त्या' एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी करण्यात आलीय. अमरावती पोलीस आयुक्तांसमोर शेखावत यांची चौकशी झाली.

Updated: Feb 21, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, अमरावती

 

अमरावतीमधल्या 'त्या' एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी करण्यात आलीय. अमरावती पोलीस आयुक्तांसमोर शेखावत यांची चौकशी झाली.

 

 

शेखावत यांच्यासह राजेंद्र मुळक, गाडीचा मालक अग्रवाल, त्या गाडीचा ड्रायव्हर आणि मुळक यांच्या सहका-यालाही या चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या प्रकरणी शेखावत यांनी पोलीस आयुक्तांसमोर लेखी स्टेटमेंट दिलंय. ते एक कोटी रुपये पक्ष निधी असल्याचं स्पष्टीकरण शेखावतांनी दिलंय. दरम्यान ते कोटी रुपये परत मिळावे यासाठी पोलीस आणि न्यायालय यांनाही अर्ज देण्यात आल्याचं शेखावत यांनी म्हटलंय. गाडीचे मालक अग्रवाल यांचा ड्रायव्हर आणि मुळक यांच्या सहका-याला याआधीच अटक करण्यात आलेली आहे.

 

 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असताना एका कारमध्ये तब्बल एक कोटी रुपये रोख सापडले होते. अमरावतीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते पाठविण्यात आले होते, असा खुलासा कॉंग्रेसने दिला होता. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने आदेश दिल्यावर आज सकाळी अमितेशकुमार यांनी रावसाहेब शेखावत यांची चौकशी केली. दरम्यान, एक कोटी रुपये सापडल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.