अखेर प्राध्यापकांचा संप मागे

राज्यातला प्राध्यापकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आलीय.

Updated: May 18, 2012, 05:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यातला प्राध्यापकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आलीय. पेपर तपासणीचं काम उद्यापासून सुरु होणार आहे. १० विद्यापीठांतील ३० हजार संपावर गेलेले प्राध्यापक उद्यापासून कामावर रुजू होणार आहेत.

 

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यातले प्राध्यापक संपावर गेले आहेत. सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका संपकरी प्राध्यापकांनी घेतली होती. सेट-नेटबाधित शिक्षकांची मान्यता आणि सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी याबाबत  सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतरही प्राध्यापकांनी संप मागे घेण्यास नकार दर्शवला होता. दहा महिन्यांची वेतन थकबाकी जून २०१२  आणि एप्रिल २०१३ मध्ये देऊ, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण, ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेला हा पर्याय मान्य नव्हता. त्यावर राजेश टोपे यांनी लेखी पत्र देऊन संपकरी प्राध्यापकांना दिलासा दिला आहे.