सचिनचं शतक आणि भारताची हार !

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

Updated: Mar 17, 2012, 03:37 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

सचिनने बांग्लादेशविरूद्ध महाशतक झळकवलं आणि क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला यामुळे उधाण आलं. पण, त्यानंतर भारताच्या फिक्या पडलेल्या बॉलर्सनी काहीच प्रभावी कामगिरी न केल्यामुळे भारत कालची मॅच हारला. पण, तरीही या गोष्टीचा संबंध सचिन तेंडुलकरशीच जोडण्यात आला. सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं.पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

 

क्रिकेटमधली आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की सचिन बहुतेकवेळा मॅचविनर ठरला आहे. सचिनने आत्तापर्यंत १०० शतकं केली. त्यातील ५१ शतकं आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात तर ४९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात केली आहेत. ४९ कसोटी सामन्यातील २० सामने भारत जिंकला आहे तर ११ सामन्यांत भारत पराभूत झाला आहे. उर्वरित १८ सामने अनिर्णित राहिले आहेत.

 

याच प्रमाणे ४९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सचिनचे शतक हे भारताच्या विजयाला हातभार लावणारेच ठरले आहे. ४९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ३४ मॅचेसमध्ये भारताने विजय संपादन केला आहे. १५ सामन्यांमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर १ सामना अनिर्णित राहिला होता. म्हणजेच १०० मॅचेसपैकी फक्त २६ मॅचेसमध्ये सचिनने शतक झळकाऊनही भारताला पराभव पाहावा लागला होता. उरलेल्या ७४ सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी हिच भारतासाठी तारणहार ठरली आहे. त्यामुळे सचिनने शतक केलं की भारत मॅच हारतो, ही केवळ एक अफवा आहे, हेच यातून सिद्ध होते.