सचिन तेंडुलकर खेळणार!

आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सर्व आशा आता सचिन तेंडुलकरवर केंद्रीत झाली आहे. सचिन पुनरागमन करेल आणि भरकटत चाललेल्या संघाच्या होडीला यशस्वीपणे पैलतीर गाठून देईल, अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे. मुंबई इंडियन्सला रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Updated: Apr 23, 2012, 08:58 AM IST

www.24taas.com,  मुंबई

आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सर्व आशा आता सचिन तेंडुलकरवर केंद्रीत झाली आहे. सचिन पुनरागमन करेल आणि भरकटत चाललेल्या संघाच्या होडीला यशस्वीपणे पैलतीर गाठून देईल, अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे. मुंबई इंडियन्सला रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

४ एप्रिल रोजी चेन्नईविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला सचिन या लढतीत खेळेल, अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीत सचिनच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचा डाव केवळ ९२ धावांत संपुष्टात आला होता. दुखापतीमुळे गेल्या चार सामन्यांना मुकलेल्या सचिन तेंडुलकरने सरावाला सुरुवात केली असून, मुंबई इंडियन्ससाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, अंबाती रायडू आणि रिचर्ड लेव्ही या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. लेसिथ मलिंगा नसल्याने मुंबईच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने मुनाफ पटेलवर असेल.

किंग्ज इलेव्हनला शुक्रवारी रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या मोसमात सहाव्या सामन्यातील हा त्यांचा चौथा पराभव ठरला. स्नायूच्या दुखापतीमुळे कर्णधार अँडम गिलख्रिस्टला बंगळुरूविरुद्धच्या लढतीतून माघार घ्यावी लागली.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीतही त्याच्या सहभागाबाबत साशंकता आहे. अष्टपैलू अझर महमुदच्या समावेशामुळे पंजाब संघाची बाजू मजबूत झाली आहे. महमुदने बंगळुरूविरुद्धच्या लढतीत १४ चेंडूंमध्ये ३३ धावा फटकावल्या. पंजाब संघाच्या फलंदाजांना या मोसमात अद्याप छाप सोडता आलेली नाही.