राखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा

Last Updated: Wednesday, May 9, 2012 - 18:19

www.24taas.com, मुंबई

आमिर खानचा  ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी  वादात राहीला आहे.  आता या वादात  आयटम गर्ल  राखी सावंतनेही उडी मारली आहे. राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमिर खाननं ही संकल्पना चोरली आहे.

 

काही दिवसांपूर्वी ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राखीनं अनेक सामाजिक विषयांना स्पर्श केला होता. "आमिर खान प्रोडक्शन निर्मित  ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमाची नक्कल आहे. आमिरने  आमची संकल्पना चोरली आहे. दोन्ही कार्यक्रमांचं स्वरूपही सारखंच आहे,"  असा आरोप राखीने केला आहे. ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमात ‘मॅच्युअर्ड’ मुद्दे मांडले जात असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासाठी रात्रीचा वेळ दिली गेली. पण ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात आमिर खान असल्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासाठी मात्र सकाळची वेळ दिली गेली, अशी खंतही यावेळी राखीने व्यक्त केली.

 

आमिर खानवर चोरीचा आळ घालणारी राखी मात्र मनाने आमिरचा नितांत आदर करत असल्याचं सांगते. राखी म्हणते, "आमिरबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. मला एव्हढंच म्हणायचंय की, जेव्हा आमिर खान अशा पद्धतीचा कार्यक्रम करतो, तेव्हा त्याला एक सामाजिक कार्य संबोधले जाते. मात्र, राखी सावंत अशाच पद्धतीचा कार्यक्रम करते, तेव्हा त्याला टीआरपी मिळवण्याचा एक मार्ग समजले जाते, असे का?

 

शेवटी काय तर, यानंतर राखीला ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा लोकांसमोर यायचं आहे. त्यासाठीचेच  तर हे प्रयत्न नाही ना, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण, राखी मात्र आपण लोकप्रियता मिळविण्यासाठी हे करत नसल्याचं पुन्हा पुन्हा सांगते.

 

काही दिवसांपूर्वी, ‘सत्यमेव जयते’ या शीर्षकगीतासाठी वापरण्यात आलेला कोरस हा आपण दहा वर्षांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ याच नावाने बनवलेल्या गीताचाच आहे, असा दावा ‘युफोरिया’ बँडचे गायक पलाश सेन यांनी केला होता. यानंतर स्त्रीवादी लेखिका तसलिमा नसरिन यांनी देखील या कार्यक्रमावर टीका करत,  सुपरस्टार्स आपल्या सुंदर चेहऱ्यांचा वापर करून मुद्यांचं भांडवल करत असल्याचे म्हटले होते. आणि आता राखीनं आमिरवर केलेल्या आरोपांमुळे हा कार्यक्रम पुन्हा वादात सापडलाय.

 

 First Published: Wednesday, May 9, 2012 - 18:19


comments powered by Disqus