अखेर ३५० वर्षानंतर मुलींना शाळेत प्रवेश

Last Updated: Wednesday, March 28, 2012 - 11:14

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जून्या दिल्लीतील अजमेरी गेट येथील अँग्लो अरेबिक सेकंडरी शाळेत अखेर बदलाचे वारे वाहू लागले आहेत. फक्त मुलांसाठी असलेल्या या शाळेने आता मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा बदल स्विकारण्यासाठी ३५० वर्षांचा काळ जावा लागला आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीने सोमवारी मुलींसाठी प्रवेश खुला करण्याचा प्रस्ताव स्विकारला. मद्रसा गाझियुद्दीन म्हणून सुरु झालेली या शाळेचे रुपांतर ब्रिटीशांनी १८२८ साली अँग्लो अरेबिक कॉलेजमध्ये केलं. जून्या दिल्लीत नऊ एकर जागेवर असलेल्या या संस्थेत सध्या १९०० मुलं शिक्षण घेत आहेत.

 

व्यवस्थापन समितीने मोठ्या बहुमताने हा प्रस्ताव संमत केला. मुलींच्या संदर्भात शैक्षणिक पद्धत निश्चित करण्यासाठी प्राध्यापक अझरा रझ्झाक यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. ही कमिटी मुलींची सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विचार करणार आहे. येत्या सत्रापासून मुलींना प्रवेश देण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. गेली दोन तीन वर्षे शाळेचं व्यवस्थापन मुलींना प्रवेश देण्यावर विचार करत होती.

 

शाळेत व्यवसाय अभ्यास शिकवणाऱ्या फैझा निसार अली यांनी तीन आठवडे पालक, शिक्षक, शिक्षणतज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांशी या संदर्भात तीन आठवडे चर्चा केली. त्यानंतर हा रिपोर्ट शाळा व्यवस्थापन समितीसमोर मांडण्यात आला. मुलींना शाळा, विद्यापीठांमध्ये सहज प्रवेश मिळाल्यास त्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेता येईल असं या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे.सच्चर कमिटीच्या रिपोर्टनुसार ७२ टक्के दलित मुलींच्या तुलनेत फक्त  ६८ टक्के  मुस्लिम मुली शाळेत शिक्षण घेत आहेत. इतर समाजासाठी हेच प्रमाण ८० टक्के इतकं आहे. त्याव्यतिरिक्त ६ ते १४ वयोगटातील मुस्लिम मुलांमध्ये शाळेत न जाण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण २५ टक्के आहे.

 

 

 

 

First Published: Wednesday, March 28, 2012 - 11:14
comments powered by Disqus