उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती

राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.

Updated: Feb 6, 2012, 11:29 AM IST

www.24taas.com, लखनऊ


राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार संपणार आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या राजवटीला आव्हान देण्यासाठी राहूल गांधी आणि प्रियांका गांधी उभे ठाकले आहेत. सर्व महत्वाच्य राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना प्रचारासाठी उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे.

 

काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणासी आणि गाझीपूर इथे सभा घेणार आहेत. तर प्रियांका गांधी रायबरेली आणि अमेथीचा दौरा करतील. काँग्रेस समर्थकांच्या मोठ्या सभेत प्रियांका गांधी यांनी पी. चिदंबरम यांची पाठराखण केली. तसंच राहुल गांधी हे पंतप्रधानपद मिळावं यासाठी राजकारणात उतरले नसल्याचंही प्रियांका गांधींनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री मायावती कुशीनगर आणि गोरखपूरमध्ये रॅली घेणार आहेत. गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बसपमध्ये घमासान झालं आहे. राज्यात अनेक विधानसभा मतदारसंघात बसप, सपा, काँग्रेस आणि भाजप अशा चौरंगी लढती पाहायला मिळत आहेत.

 

राहुल गांधींनी गेल्या एक वर्षात उत्तर प्रदेशच्या कान कोपऱ्यात मतदारांशी संवाद साधला आहे. काँग्रेस पक्षाला राज्यात परत एकदा नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काँग्रेसने २००९ सालच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील २२ लोकसभा जागांपैकी ९ जागांवर विजय मिळवला होता. बसपासमोर काँग्रेसचा उदय मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून झाला आहे. उत्तर प्रदेशच्या निकालांवर राहुल गांधींची निवडणूक जिंकून देण्याची क्षमता कसाला लागणार आहे.काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी लखनऊ इथे एक रॅलीला संबोधित करणार आहे.

 

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी बलिया आणि गाझियाबाद इथे सभा घेणार आहेत. तर भाजपच्या स्टार प्रचारक उमा भारती गोंडा, सिद्धार्थ नगर आणि फैझाबाद इथे मतदारांना साद घालतील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ५५ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होईल.