काँग्रेसच्या युवराजांचे भावनिक आवाहन

काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.

Updated: Nov 22, 2011, 03:18 PM IST
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली

काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.

जनहिताच्या विरुध्द असलेल्या मुख्यमंत्री मायावतींच्या सरकारवर सडकून टीका करताना राहुल गांधींनी 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात काँग्रेस पार्टी जनतेचं सरकार स्थापन करेल असं सांगितलं. मायावती सरकारवर हल्ला चढवताना लोक कल्याण आणि विकासाकरता असलेल्या निधीचा अपहार केल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला. लोकांच्या कल्याणासाठी आणि विकास कामांकरता असलेला निधी खऱ्या लाभार्थीं पर्यंत पोहचला नाही. तसेच केंद्र सरकारने नरेगा योजनेसाठी दिलेला निधीही आम आदमीपर्यंत पोहचला नसल्याचं आणि दलालांनी तो फस्त केल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. हा निधी कुठे गायब झाला असा खडा सवालही त्यांनी बसपाच्या सरकारला केला. आजवर उत्तर प्रदेशातील सर्व बिगर काँग्रेस सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत.
तसेच गेल्या दोन दशकात उत्तर प्रदेशातील बिगर काँग्रेसी सरकार लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीही केलं नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. काँग्रेस पक्षाची ताकद आम आदमी असून आमच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी तोच असल्याचं सांगत समर्थकांशी भावनिक नाळ राहुल गांधींनी जोडली.