झळा लागल्या या जीवा, सरकार म्हणे जरा थांबा

पेट्रोलच्या भडक्याच्या झळा सरकारलाही बसू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करत, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला. तर विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला घेरलं आहे. दुसरीकडं पेट्रोलच्या दरवाढीवर नियंत्रण नसल्याचं सांगत, अर्थमंत्र्यांनी हतबलता व्यक्त केली.

Updated: Nov 5, 2011, 06:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, दिल्ली

 

पेट्रोलच्या भडक्याच्या झळा सरकारलाही बसू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करत, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला. तर विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला घेरलं आहे. दुसरीकडं पेट्रोलच्या दरवाढीवर नियंत्रण नसल्याचं सांगत, अर्थमंत्र्यांनी हतबलता व्यक्त केली. महिनाभरात दुसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर १ रुपये ८२ पैशांनी झालेल्या दरवावाढीनं संतापाचा भडका उडाला. महागाईच्या वणव्यात जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला.

 

या उद्रेकाची झळ सरकारलाही बसली. युपीएच्या घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करत विश्वासात घेत नसल्याची खंत व्यक्त केली. पंतप्रधानांचा परदेश दौरा संपवून ते देशात परतल्यानंतर दरवाढ मागे घेतली नाही, तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा त्यांनी दिला. तर विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं.

 

यूपीएत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंही वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त केली. तर राष्ट्रवादीनं दरवाढीचं समर्थन केलं. दुसरीकडं पेट्रोल दरवाढीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचं सांगत अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी हतबलता व्यक्त केली. मात्र यामुळं महागाई वाढेल, असं तेल त्यांनी या वणव्यात ओतल.देशभरात उमटत असलेल्या संतप्त प्रतिक्रियानंतंर काँग्रेस पक्षानंही आम आदमीला दिलासा देण्याचा मार्ग सरकारनं शोधावा असा सल्ला दिला. त्याचबरोबर ममतांनी केलेले विश्वासघाताचे आरोपही फेटाळले आहेत. पेट्रोलच्या भडक्याच्या झळा सरकारला बसणार हे लक्षात आल्यानंतर, आता ही दरवाढ मागे घेतली जाईल, अशी माहितीही काँग्रेस सूत्रांकडून मिळतेय. एकूणच या दरवाढीवरुन राजकारण सुरु झालं असून, अधिक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अडचणीत असलेल्या मनमोहन सरकारपुढं नवं संकट यानिमित्तानं समोर उभं राहिलं आहे.