'थेन'चे ४० बळी, तमिळनाडूत मुसळधार

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली 'थेन' चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. सततचा पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता बळींचा आकडा ४० वर पोहचला आहे.

Updated: Dec 31, 2011, 01:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, चेन्नई

 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली 'थेन' चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. सततचा पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता  बळींचा आकडा ४० वर पोहचला आहे.

 

तमिळनाडू आणि पॉंडिचेरीला  चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्यामुळे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज जोरदार पाऊस कोसळत आहे.

 

तमिळनाडूतील सहा जिल्ह्यांवर या चक्रीवादळाने परिणाम केला असला, तरी सर्वाधिक नुकसान कुद्दलूर जिल्ह्याचे झाले. या जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

 

बंगालच्या उपसागरात आलेले 'थेन' चक्रीवादळ तामिळनाडूत घुसल्याने याआधी सहा जण ठार झाले आहेत. तामिळनाडूतील कडड्लोर आणि पॉंडेचरीमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पॉंडेचरीचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. कड्डलोरमध्ये भिंत तसेच वीज कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील नागरिकांना इशारा देण्यात आला होता.

 

आंध्रप्रदेश, पॉन्डेचेरी आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या क्षेत्राला या वादळामुळं धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या हे वादळ चेन्नईपासून अडीचशे किलोमीटर दक्षिण पूर्वेकडे तर पॉन्डेचेरीपासून दोनशे सत्तर किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे.

 

या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश, पॉन्डेचेरी आणि चेन्नई किनारपट्टीच्या क्षेत्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळामुळं चेन्नईसह देशभरातल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठमोठाल्या लाटा उसळत आहे. या लाटांमुळं मच्छिमारीसाठी गेलेले अनेक मच्छिमार बेपत्ता आहेत.