नितीन गडकरींचा यु-टर्न

नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान तसंच अध्यक्षपदासाठी लायक उमेदवार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. भाजप अध्यक्ष गडकरींनी आता पलटी मारली आहे.

Updated: Jan 23, 2012, 04:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान तसंच अध्यक्षपदासाठी लायक उमेदवार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. भाजप अध्यक्ष गडकरींनी आता पलटी मारली आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारा संबंधीचा निर्णय निवडणुकी नंतर घेण्यात येईल असं आता गडकरींचे म्हणणं आहे. हे कमी की काय पक्षाच्या अध्यक्षाचं यासंदर्भात कोणतंही मत नसतं असं गडकरी म्हणाले आहेत.

 

नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष बनण्यासाठी असाधरण क्षमता असल्याचं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले होते. गडकरी म्हणाले की भाजप एका व्यक्तीची जहागीर नसून पक्षाचे नेते एकत्र येऊन पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करतात. भाजपने मोदींना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी सोपवली पाहिजे का असं विचारल्यानंतर नितीन गडकरींनी त्यांच्यात असलेल्या असाधारण क्षमतेचा साक्षात्कार झाला होता. त्यानंतर काही तासांचा अवधी उलटत नाही तोवर आपण काय बोलून बसलो याची जाणीव होऊन गडकरी परत एकदा भानावर आले आहेत असं दिसतं.