विकृत समाजावर 'शालीन'तेचं वस्त्र

Last Updated: Monday, August 6, 2012 - 14:46

www.24taas.com, बिजनौर

राजस्थानात जाट समाजातल्या एका समुदायानं मुलींना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय. मुलींनी जीन्स आणि टी-शर्ट घालून कॉलेज जाणं भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याविरोधात आठ ऑगस्टपासून एक अभियान सुरू करण्याचा निर्णयही या संघटनेनं घेतलाय.

 

‘राष्ट्रीय जाट महासंघ’ असं या संघटनेचं नाव आहे. रविवारी हल्दौरमध्ये झालेल्या पंचायतीत या संघटनेचे महासचिव नृपेंद्र देशवाल यांनी ही घोषणा केलीय. ‘जीन्स आणि टी-शर्ट भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे. स्वातंत्र्याच्या नावावर या पद्धतीचे हे पोशाख महिलांसाठी बऱ्याचदा शरमेची बाब ठरतात’ असं यावेळी देशवाल यांनी म्हटलंय. ‘समाजात वाढत असलेल्या विकृतींमुळे महिलांनी शालीन वस्त्र परिधान करून स्वत:ला छेडछाडीपासून दूर ठेवावं आणि इतर अभद्र घटनांना आमंत्रण देण्याबद्दल दोषी ठरू नये’ अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडलीय.

 

येत्या आठ ऑगस्टपासून राष्ट्रीय जाट महासंघ एक अभियान सुरू करणार आहे. यामध्ये विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना भेटी देऊन यासंबंधी महाविद्यालयात शालीन पोशाखाबाबत आग्रह केला जाईल. शिवाय मुलींनी जीन्स आणि टी-शर्ट घालून कॉलेज जाण्याविरुद्ध शहरामध्ये पदयात्राही काढली जाईल, असं संघटनेतर्फे स्पष्ट केलं गेलं. इतकंच नाही तर महासंघाच्या जिल्हा अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, संघटना मुलींनी महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये मोबाईल वापरण्याच्याही विरुद्ध आहे.

 

.

First Published: Monday, August 6, 2012 - 14:46
comments powered by Disqus