पत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या

संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Updated: Jul 3, 2012, 11:03 AM IST

www.24taas.com, ठाणे

संजय उंबरकर  या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना  ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

भिवंडीच्या पी. डी. कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या संजय उंबरकर (४२) यांच्या पत्नी स्वाती उंबरकर(४०) याही भिवंडीच्या बीएनएन कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. वर्धमान सोसायटीतील ट्युलिप टॉवरच्या सातव्या मजल्यावर उंबरकर दाम्पत्य अथर्वा (९) आणि ऋग्वेद (१४) या मुलांसह राहात होते. सोमवारी संध्याकाळी काही कामानिमित्त स्वाती घराबाहेर पडत असताना संजय यांनी त्यांना थांबवले. काही बोलायचे आहे असे सांगत त्यांनी स्वाती यांना बेडरूममध्ये नेले आणि घरातल्या सुऱ्याने त्यांच्या अंगावर सपासव वार केले.

आईचे ओरडणे ऐकून दोन्ही मुले बेडरूमच्या दिशेने धावली असता संजय यांनी मुलीवरही चाकू हल्ला केला. ऋग्वेदने घरातून पळ काढल्यामुळे तो बचावला. मात्र , स्वाती आणि अथर्वा मात्र जागीच ठार झाल्या. त्यानंतर संजयने स्वतःच्या मनगटावरील नसा कापून आणि पोटात सुरा खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी संजय यांना स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून , त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे भोईर यांनी सांगितले.

ऋग्वेद रात्री सव्वादहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर हा सारा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. आई आणि वडिलांची गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणं व्हायची. त्यातूनच हा प्रकार झाल्याचे ऋग्वेदने सांगितले असले तरी , भांडणाचे निश्चित कारण मात्र समजलेले नाही.