विमा घोटाळ्यांवर लवकरच कारवाई

परभणी आणि जळगाव जिल्हा बँकेत झालेला हा कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा म्हणजे सहकारी बँका का बुडत आहेत याचं एक कारण म्हणून याकडं पाहता येईल. राजकीय सोयीसाठी दोषींना पाठिशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.

Updated: Nov 9, 2011, 10:44 AM IST

झी २४ तास वेब टीम, परभणी

 

परभणी आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकरी अपघात विमा घोटाळ्याप्रकरणी असलेल्या दोषींवर लवकरच कारवाई होणार आहे. परभणीत आमदार बोर्डीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जळगावमध्ये ईश्वरलाल जैन आणि विजय नवल पाटलांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासदांच्या नावे बोगस अपघात विमा काढून बँकेला सात कोटी ४१ लाख रुपयांचा चुना लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये काँग्रेस आमदार आणि बँक अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर, बँकेचे कार्यकारी संचालक आणि 'आयुकेअर इन्शुरन्स'च्या अध्यक्षांचा समावेश आहे. बँकेचे संचालक स्वराजसिंह परिहार यांनी याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर कोर्टानं दोषींविरोधात गुन्हा नोंदवण्याचं आदेश पोलिसांना दिले. राष्ट्रवादीनंही मोर्चा काढून आमदार बोर्डीकरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतही काहीसा असाच प्रकार घडून आला आहे. सभासद शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्यासाठी प्रत्येकाकडून गोळा केलेली ३ कोटी ९४ लाखांची एकूण रक्कम विमा कंपनीच्या एका एजंटाच्या नावे जमा करण्यात आली होती. मात्र असा कुठलाही एजंट अस्तित्वात नसल्याचं समोर आल्यानंतर या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केली होती. त्यामुळंच दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत.  तत्कालीन बँक अध्यक्ष ईश्वरलाल जैन आणि उपाध्यक्ष विजय नवल-पाटील यामुळं अडचणीत आलेत. परभणी आणि जळगाव जिल्हा बँकेत झालेला हा कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा म्हणजे सहकारी बँका का बुडत आहेत याचं एक कारण म्हणून याकडं पाहता येईल. राजकीय सोयीसाठी दोषींना पाठिशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा सहकार चळवळ कशी होती याचा पाठ पुढच्या पिढीला इतिहासाच्या पुस्तकांमधून शिकवावा लागेल.