विवाहाचे गिफ्ट; उपेक्षितांच्या मदतीसाठी

Last Updated: Monday, June 4, 2012 - 16:04

www.24taas.com, अमळनेर, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यात  सात जन्माचे फेरे घेणाऱ्या अर्चना सावंत आणि अभिजित शिंपी या नवदाम्पत्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. स्वत:च्या लग्नाचे गिफ्ट उपेक्षितांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. समाजसेवी संस्थांना सुमारे एक लाख रूपयांची देणगी देऊन नवा पायंडा पाडला.

 

अभिजित आणि अर्चना या नवदाम्पत्याचा विवाह २८ मे रोजी येथील नर्मदावाडी मंगल कार्यालयात गायत्री संप्रदायाच्या वैदिक पद्धतीने पार पडला. येथील प्रताप हायस्कूलचे सेवानवृत्त शिक्षक चंद्रकांत सीताराम शिंपी (भांडारकर) व जी.एस. हायस्कूलच्या शिक्षिका वैशाली चंद्रकांत शिंपी यांचा मुलगा अभिजित याचा विवाह पंढरपूर येथील वसंतराव सखाराम सावंत आणि निर्मला वसंतराव सावंत यांची कन्या अर्चना हिच्याशी झाला.

 

वर अभिजितने गायत्री परिवारातून घेतलेल्या संकल्पाने केलेल्या अंशदानातून 'वंचित विकास' संचलित 'निहार' या संस्थेला (बाल संगोपन केंद्र, पुणे) ५0 हजारांची आर्थिक मदत दिली तर वधू अर्चना हिने प्रभाहिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' (एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन केंद्र, सोलापूर) या संस्थेस ४१ हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. अभिजित याची पुण्यात इंडिया मुव्हमेंट भांडारकर अकॅडमी नामक संस्था आहे. तो पद्व्युत्तर आहे. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे तो वर्ग चालवितो. त्याच्या कमाईचा रोज थोडा हिस्सा तो अंशदानासाठी राखून ठेवत होता. त्या पैशातून त्याने ही देणगी दिली आहे.

 

वधू अर्चना ही सातार्‍याच्या महाविद्यालयात अधिव्याख्याता होती. तिने तिच्या वेतनातून बचत करीत जमविलेली रक्कम दान केली आहे. ना मिरवणूक ना बॅण्ड, डीजे ना अनिष्ट रूढींना फाटा देऊन हा विवाह सोहळा पार पडला. वैदिक पद्धतीचे अर्थ स्पष्ट करीत विवाह विधी पार पडला. ९-९ प्रकारच्या प्रतिज्ञा, मंगलाष्टके, सप्तपदी धर्मोपदेश दिला गेला 'आदर्शवादी तो समाज में आबादी' या उद्घोषणेतील सत्यार्थ सगळ्यांनी अनुभवला.

First Published: Monday, June 4, 2012 - 16:04
comments powered by Disqus