गोळीबारांनी हादरलं पिंपरी-चिंचवड

गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

Updated: Jun 18, 2012, 08:50 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

 

निगडीच्या भक्ती-शक्ती उद्यानाजवळ एका होंडा सिटी कारमध्ये बसलेल्या युवकावर गोळीबार करण्यात आला. गाडीत बसलेल्या परिचित व्यक्तीनेच गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयदीप भगवान देवकुळे (वय-25,रा. वाशी, नवी मुंबई) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा नवीमुंबईत गजानन केबल नेटवर्किंग नावाने इंटरनेट केबलचा व्यवसाय आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयदीप आणि त्याचा मित्र जगदीश हे दोघे अन्य दोघांसोबत नवी मुंबईहून मोटारीने (एमएच 45 एजे 2772) निगडीमध्ये केबल नेटवर्किंगच्या कामानिमित्त आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास सर्वजण भक्ती-शक्ती चौकाजवळील वृंदावन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन ते मोटारीत बसले. त्याचवेळी जयदीपवर गोळी झाडण्यात आली. मोटारीच्या मागील सीटवर बसलेल्या परिचित व्यक्तीनेच जयदीपला गोळी घातल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

या घटनेत जयदीप गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयदीपच्या छातीच्या उजव्याबाजूने गोळी आत घुसली असून गोळीचा एक तुकडा छातीत अडकला आहे. दुसरा तुकडा पोटाकडे सरकला असल्याने जयदीपची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.