जखमी दयानंदशी जुळतायत स्फोटाचे धागेदोरे?

Last Updated: Thursday, August 2, 2012 - 16:15

www.24taas.com, पुणे

पुणे बॉम्बस्फोटाच्या चौकशीला सुरुवात झाली असून तीन दिशांनी तपास यंत्रणा या स्फोटाच्या सूत्रधारांचा माग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याच्याच पिशवीत स्फोट झाल्यानं, त्याच्याकडून या स्फोटाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी सुरु आहे.

 

पुण्यातल्या स्फोटांचे गूढ कायम आहे. सूत्रधाराचे धागेदोरे मिळवण्यासाठी एटीएस कसून चौकशी करतेय. स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलनं संभ्रमित करणारा जबाब दिल्यानं त्याच्यावरही संशय बळावला आहे. एटीएस दयानंद पाटीलची कसून चौकशी करत आहे. दयानंदला अजून क्लीन चिट दिली नसल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलीय. दयानंद पाटील हा कर्नाटकचा रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यातील उरळी कांचन भागात वास्तव्याला आहे. दहावीपर्यंत शिकलेला द्यानंद पुण्यात टेलरिंगचा व्यवसाय करतोय. तो पुण्यात त्याची पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीसोबत वास्तव्य करतो. पण, दयानंदच्या अशिक्षित पत्नीला मात्र दयानंद कुठे आणि काय काम करतो, हे माहित नाही.

 

दरम्यान, पुण्यातील साखळी स्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या सायकली कुठून विकत घेण्यात आल्या याचा छडा लागलाय. पुण्यातील कसबा पेठेतल्या सोनी सायकल ट्रेडींग कंपनी या दुकानातून सायकली विकत घेण्यात आल्या होत्या. लाल रंगाच्या या तीन सायकली होत्या. स्फोटात वापरलेल्या नव्या को-या सायकली विकत घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी सायकल दुकानाच्या मालकासह एका नोकराला ताब्यात घेतलयं. कसबा पेठ ही सायकलचं मोठं मार्केट आहे. त्यामुळं कसबा पेठेतूनच सायकली विकत घेतल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय होता. तो संशय आता खरा ठरलाय. काही ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून, यातून काही धागेदोरे मिळतायेत का, याचाही शोध सुरु आहे.

 

‘दहशतवादी हल्ल्या’बाबत अजूनही संभ्रम 

पुण्यातील स्फोट दहशतवादी हल्ला आहे का? याबाबत अजून माहिती नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय. पुण्यात एनआयए आणि एनएसजीच्या टीम्स पाठवण्यात आल्या असून कसून चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच याबाबत सांगता येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलीय.

 

.

First Published: Thursday, August 2, 2012 - 16:15
comments powered by Disqus