रेल्वे बजेटकडून पुणेकरांना अपेक्षा

पुणे शहराचा बदलता चेहरामोहरा, वाढती लोकसंख्या, उद्योग व्यवसायातील प्रगती लक्षात घेता पुणेकरांच्या रेल्वे बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. यापैकी काही रेंगाळलेले प्रकल्प सुरु करण्याबातच्या आहेत.

Updated: Mar 10, 2012, 09:18 AM IST

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे

 

पुणे शहराचा बदलता चेहरामोहरा, वाढती लोकसंख्या, उद्योग व्यवसायातील प्रगती लक्षात घेता पुणेकरांच्या रेल्वे बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. यापैकी काही रेंगाळलेले प्रकल्प सुरु करण्याबातच्या आहेत. तर काही नव्या गाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवण्यासंदर्भातील आहेत.

 

पुण्याचा होत असलेला विस्तार पाहता रेल्वे वाहतुकीचा विस्तार आणि विकास करण्यास इथं भरपूर वाव आहे. परंतु रेल्वेचे अपूर्णावस्थेतील प्रकल्प आणि मागण्यांचा विचार करता रेल्वे मंत्रालयाच्या उदासीनतेचा फटका पुणेकरांना बसत असल्याचं लक्षात येतं. मुंबई-पुणे-नाशिक या औद्योगिक शहरांना जोडणारा सुवर्णत्रिकोण प्रलंबित आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर आणि पुणे-दौंड या मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण अद्याप अपूर्ण आहे. कर्जत-पनवेल मार्गाचं दुपदरीकरणही अद्याप प्रलंबित आहे. पुणे-नगर, पुणे-नाशिक लोहमार्ग अस्तित्वात येण्याच्या प्रतिक्षेत आहे. पुणे मध्यवर्ती स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी खडकी, लोणावळा आणि मांजरी इथं स्वतंत्र टर्मिनलची मागणीही प्रलंबित आहे.

 

प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मार्गांवर गाड्या सुरु करणं आणि काही गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा सुटणाऱ्या पुणे-जयपूर आणि पुणे-जोधपूर एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवणं, पश्चिम महाराष्ट्र-कोकणला जोडणारी पुणे-रत्नागिरी-सावंतवाडी सुपरफास्ट गाडी सुरु करणं गरजेचं आहे. तसंच पुणे-नगर-शिर्डी, पुणे-चेन्नई, पुणे-बंगळुरु, पुणे-राजकोट या सुपरफास्ट गाड्या सुरु करण्यात याव्यात. पुणे-चंद्रपूर, पुणे-गुवाहाटी, पुणे-अमरावती, पुणे-जम्मू एक्सप्रेस या नवीन गाड्या सुरु करण्यात याव्यात. नांदेड, सोलापूर, रत्नागिरीसाठी इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे-कोल्हापूर दरम्यान शताब्दी एक्सप्रेस सुरु करण्याची अत्यंत गरज आहे. पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात. तसंच पुणे-दिल्ली ही ‘दुरांतो एक्सप्रेस’ रोज सोडण्यात यावी. अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.

 

रेल्वेसंदर्भातील मागण्या मांडणं आणि त्या मंजूर करुन घेणं, ही इथल्या खासदारांची जबाबदारी. परंतु ती पार पाडण्यासाठी हे खासदार गेली ८ महिने कुठे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं या मागण्या रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहचाव्यात आणि त्यादृष्टीने येत्या रेल्वे बजेटमध्ये तरतुदी व्हाव्यात. एवढीच माफक अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.