औरंगाबाद पर्यटनाकडे कोणाडोळा

मराठवाड्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणजे औरंगाबाद. इथं येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असूनही रेल्वे मार्गाच्या बाबतीत मात्र प्रवाशांच्या पदरी घोर निराशाच पडलीय. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहेत. नेत्यांकडे इच्छा आहे पण प्रभावी रेट्याचं टॉनिक नाही त्यामुळे मराठवाडा विभाग अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.

Updated: Mar 10, 2012, 09:58 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद 

 

मराठवाड्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणजे औरंगाबाद. इथं येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असूनही रेल्वे मार्गाच्या बाबतीत मात्र प्रवाशांच्या पदरी घोर निराशाच पडलीय. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहेत. नेत्यांकडे इच्छा आहे पण प्रभावी रेट्याचं टॉनिक नाही त्यामुळे मराठवाडा विभाग अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.

 

 

पर्यटनाच्या निमित्तानं दरवर्षी हजारो पर्यटक मराठवाड्याच्या राजधानीत येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा वेगानं विस्तार झालाय. मात्र त्या तुलनेत रेल्वेचा विकास अजिबात झालेला नाही. औरंगाबादहून मुंबईकडे येणारी एकमेव गाडी म्हणजे जनशताब्दी एक्स्प्रेस...बाकी तीन गाड्या बाहेरगावाहूनच येतात. त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी इथल्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. तर पुण्याला जाण्यासाठी गाडीच नाही.  लोकप्रतिनिधींही म्हणावा तसा पाठपुरावा करत नसल्यानं मराठवाड्याच्या पदरी निराशाच आली आहे.

 

 

 गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याच्या अनेक मागण्या रेल्वेकडे प्रलंबित आहेत. रोटेगाव पुणतांबा रेल्वे मार्गाची  मागणी १९९५ पासून प्रलंबित आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर ९० कि.मी कमी होवून शिर्डी, नगर, पुणे, गोवा ही शहरं औरंगाबादला जोडता येतील. याशिवाय पोटूल ते चाळीसगाव रेल्वेमार्गाचीही मागणी प्रलंबित आहे.

 

 

जनशताब्दीसह मुंबईला जाणा-या गाड्यांच्या डब्यांची संख्या २४ करण्यात यावी, परभणी ते मनमाड दुहेरी लाईन, नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून तोडून मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे, औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण करण्यात यावं, सोलापूर, जळगाव रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात यावं अशा अनेक मागण्या रेल्वेदरबारी प्रलंबित आहेत. मात्र रेल्वे निधी नसल्याचं कारण देऊन रेल्वे प्रशासनानं मराठवाड्याकडे दुर्लक्षच केलंय.

 

 

भौगोलिकदृष्ट्या राज्यात आणि देशात मध्यवर्ती स्थान असलेला मराठवाडा आजही रेल्वेच्या नकाशावर बाजुलाच आहे. किमान यंदाच्या बजेटमध्येतरी मराठवाड्याची उपेक्षा होऊ नये आणि रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षा इथल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.