सायकलवर ठेवले होते बॉम्ब

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, February 21, 2013 - 21:12

www.24taas.com,हैदराबाद
हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट झालेत. हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जखमी झालेत.
कोणार्क आणि व्यंकटाद्री चित्रपटगृहांसह दिलसुखनगर बस स्थानक परिसरात तीन साखळी बॉम्बस्फोट झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीषण बॉम्बस्फोटांत ११ जण ठार झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिलसुखनगर भागाची नाकाबंदी करण्यात आली आहे. हा परिसर रिकामा करण्यात येत आहे. या भागात साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. आज गुरुवारी मंदिरासमोर दर्शनासाठी रांगा लागल्या असल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बॉम्बस्फोटाचे वृत्त हाती आल्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आंध्रप्रदेशचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन बॉम्बस्फोट झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात ११ ठार झाल्याचे सांगतानाच दहशतवादी हल्ले होण्याची माहिती आधीच मिळाली होती, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलेय.First Published: Thursday, February 21, 2013 - 20:49


comments powered by Disqus