आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा

विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2013, 05:51 PM IST

www.24taas.com, मुंबई

विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यानंतर पाच आमदारांना निलंबित करण्यात आलेय. निलंबित पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यानुसार आज या आमदारांवर निलंबन कारवाई झाली.

सत्ताधारी आमदारांवर का कारवाई केली गेली नाही केवळ विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का, असा सवाल शिवसेना, भाजपने उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता गुन्हे दाखल कसे करण्यात आलेत. विरोधकांना सीसीटिव्ही फुटेज का दाखविले नाही, असे एकनाथ खडसे यांनी सरकारला विचारले आहे.
एका गुन्हासाठी दोन शिक्षा कशा काय असू शकतात. सत्ताधाऱ्यांनी केवळ विरोधकांना बळी दिले आहे. सत्ताधारी आमदारांची नावे आहेत. असे असताना केवळ पाच आमदारांवरच कारवाई कशी, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने या कारवाईबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.