नाट्य संमेलनात उत्साहाची उणीव

Last Updated: Saturday, January 21, 2012 - 13:30

www.24taas.com, सांगली

 

सांगलीत बालगंधर्व नाट्यनगरीत ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात  चागंली झाली आहे. मात्र, म्हणावी तशी गर्दी झालेली नाही. सुरूवातीला बेळगाव सीमावर्ती भागातील लोकांनी हंगामा केला. त्यामुळे  काहीसे वातावरण गरम  झाले होते. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय नेतेमंडळीनीही या संमेलनाकडे पाठ फिरवलेली दिसून येत  आहे.  त्यामुळे उत्साहाची उणीव दिसून येत आहे.

 

तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगर्दीतल्या निम्म्या खुर्च्याही भरलेल्या नाहीत. अनेक प्रसिद्ध कलाकार नाट्यसंमेलनाला अनुपस्थित आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी येणाऱ्या रसिकांचा हिरमोड झाला आहे.

 

गेल्यावर्षीच नाट्यपरिषदेने कलाकारांनी नाट्यसंमेलनाला उपस्थित राहावं, अशा आशयाचा ठराव संमत केला होता. पण असा ठराव करुनही कलाकारांनी संमेलनाकडे पाठच फिरवली आहे. शनिवार-रविवार असल्याने अनेक कलाकार मोठमोठ्या निर्मात्यांच्या नाटकात बिझी आहेत. त्यामुळेच निर्माते आणि कलाकार संमेलनाला उपस्थित राहिले नाहीत. उद्या संमेलनाचा समारोप असल्यानं उद्यापर्यंत तरी या संमेलनाला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

 

दरम्यान,  महाराष्ट्र राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेचे पडसाद नाट्यसंमेलनातही दिसून आले. संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. तर आयोजकांनी मुख्यमंत्री येतील, मंचावरही उपस्थित राहतील, पण कोणतीही घोषणा करणार नाहीत, असं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी उद्धाटनाच्या कार्यक्रमाला येणंच टाळलं.

 

[jwplayer mediaid="33435"]

 

[jwplayer mediaid="33428"]

 

First Published: Saturday, January 21, 2012 - 13:30
comments powered by Disqus