सावरकरांच्या गीतांचा अल्बम

Last Updated: Friday, March 30, 2012 - 21:01

www.24taas.com, मुंबई

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यसैनिक म्हणून कार्य जेवढं अतुलनीय तेवढंच एक महाकवी म्हणूनही अद्वितीय. भरत बलवल्ली आता अधुनिक तंत्राद्वारे त्यांचं हे महाकवित्व आपल्या समोर आणत आहेत.  सावरकरांच्या निवडक कविता आता सीडी अल्बमच्या स्वरुपात रसिकांना उपलब्ध होत आहेत.

 

‘ने मजसी ने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला’......मातृभूमीच्या प्रेमाने ओथंबलेल्या या काव्यपंक्ती अर्थात विनायक दामोदर सावरकर यांच्या... १९६८ साली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेला पहिल्यांदा चाल दिली. त्यानंतर ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी ‘वीर सावरकर’ या २००४ साली आलेल्या सिनेमात याच गाण्यानं सिनेमाचा शेवट केला होता. आता ८ वर्षांनंतर
भरत बलवल्ली पुन्हा एकदा सावरकरांचं काव्य नव्या स्वरसाजासह आणत आहेत.

साधना सरगम,शंकर महादेवन, शान,सोनू निगम, स्वप्नील बंदोडकर, वैशाली सामंत अशा आघाडीच्या गायकांनी आपला स्वरसाज कवितांना दिलाय. विशेष म्हणजे या अल्बमला दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांचं संगीत संयोजन लाभलंय.

 

देशभक्तीपर कविताच नाही तर सावरकरांनी लिहिलेल्या काही दुर्मिळ भावगीतांचा समावेशही या अल्बममध्ये असेल. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हेदेखील या अल्बमसाठी उत्सुक आहेत.सावरकरांचं काव्य अजरामर आहे. आणि म्हणूनच आजंही अनेक तरुण संगीतकारांना ही काव्यप्रतिमा खुणावते.

 

[jwplayer mediaid="74814"]First Published: Friday, March 30, 2012 - 21:01


comments powered by Disqus