`स्वरभास्करा`च्या नावानं...

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, January 3, 2013 - 15:00

www.24taas.com, मुंबई
शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी राज्यसरकारनं विविध योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं विविध योजना राबवण्यात येणार आहेत.
याबद्दलचा एक प्रस्ताव सांस्कृतिक खात्याकडून कॅबिनेटमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात मिळालीय. त्यानुसार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय शास्त्रीय संगीतातील उदयोन्मुख आणि होतकरु १२ तरुणांसाठी दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तर दरवर्षी एका महसूल विभागात पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव भरवण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या सहा संस्थांना प्रत्येकी दोन लाखांचं अनुदान देण्यात येणार आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गुरुकुल योजना, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना अनुदान हे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी कलाकाराची निवड भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार निवड समिती करणार आहे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनी २४ जानेवारी रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. दर वर्षी एका महसुली विभागात दोन दिवसांचा हा महोत्सव होणार असून यासाठी शास्त्रीय गायन क्षेत्रातील दोन आणि शास्त्रीय वादन क्षेत्रातील दोन अशा चार कलावंतांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

First Published: Thursday, January 3, 2013 - 10:28
comments powered by Disqus