संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 19:18

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
लोणार तालुक्यात शारा या गावातल्या अरविंद डव्हळे यांच्या शेतीवर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटं भेट दिली आणि ते परत निघाले. त्यावेळी जमलेल्या शेतक-यांनां मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र मुख्यमंत्री न थांबल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी त्यांची गाडी आडवायचा प्रयत्न केला.
याचवेळी पोलिसांनी गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केल्यावर शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही काळ रास्तारोको करण्यात आलं. वास्तविक पहूर गावात सर्वाधिक नुकसान झालंय. पण या गावाला भेटही न देता मुख्यमंत्री तिथून निघून गेले. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कालपासून गारपीटग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत. गारपीटग्रस्त शेतक-यांच्या व्य़था मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. कोणाही कितीही हरकत घेतली तरी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणारच, आचारसंहितेचा अडसर नुकसान भरपाई जाहीर करताना येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त मोसंबी बागांची तसेच ज्वारी आणि गव्हाच्या नुकसानीची पाहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014 - 19:08
comments powered by Disqus