मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2013, 06:45 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यातील ८ हजार ५४० गावांपैकी ३२९९ गावात दुष्काळ पडल्याचं शासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. या गावांची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. मात्र, दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.
यंदा पावसानं दडी मारल्यानं मराठवाडा भीषण दुष्काळात होरपळून निघतोय. मराठवाडा अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जालना जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३० टक्क्याच्या आत पाऊस झाला तर औरंगाबाद बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलाय. औरंगाबाद ११७६ गावं, जालना ९७० गावं, बीडमधील ६८५ गावं, उस्मानाबाद ४३८ गावं आणि परभणी ६० गावं दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेत.
त्यामुळे या भागातल्या खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामही हातचा जाणार यात शंका नाही. जिथं माणसालाच पाणी नाही जनावरांना काय पाजायचं? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कित्येक ठिकाणी तर लोक जनावरांना डोक्यावर टीका लावून सोडून दिलं जातंय.
मराठवाड्यात सगळ्यात कमी पाऊस झालेला जिल्हा म्हणजे जालना... जालना जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यायात सगळीकडेच भीषण पाणीटंचाई आहे. जालन्यातील
 आठ तालुक्यातींल ९७० गावांत पाणीटंचाई
 सर्वंच गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी
 टंचाई निवारणासाठी अजूनही थातूरमातून नियोजन
 भूगर्भातील पाण्याची पातळी १०० फुटांहून खाली गेलीय.
 जालन्यातील एकूण जलसाठा १ ते २ टक्के

वर्षाच्या सुरुवातीलाच ही दशा आहे तर येत्या उन्हाळ्यात काय होणार? याची चिंता या जिल्ह्यातील नागरिकांना लागलीय तर मोसंबीसारखं कोट्वधींच्या उलाढालीचं पिकही पाण्याअभावी करपून गेली आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात आता केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्री-नेत्यांचे दौरे होणार आहेत. मराठवाड्याला ही मंडळी न्याय देणार की तोंडाला पानं पुसणार याकडेच दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहेत.