`साहेब` तुमच्यासाठी कायपण....!

साहेब, तुमच्यासाठी काय पण!... असं म्हणत, अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या `देवा`साठी इतर देवांना मात्र पाण्यात ठेवलं आहे.

Updated: Nov 16, 2012, 10:45 AM IST

www.24taas.com, मुंबई
साहेब, तुमच्यासाठी काय पण!... असं म्हणत, अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या `देवा`साठी इतर देवांना मात्र पाण्यात ठेवलं आहे. ‘मातोश्री’ बाहेरील गर्दीतील प्रत्येकाचे आज हेच सांगणे होते. ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष आणि ‘ॐ नम: शिवाय’चा, जसजशी प्रकृतीबद्दल माहिती मिळत होती. तसतसं शिवसैनिक गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत होते. . गणपती बाप्पाची आरती म्हणत शिवसेनाप्रमुखांना उदंड आयुष्य लाभू दे! अशी प्रार्थना त्यांनी देवाजवळ केली.
मनोरमा नेरुरकर आणि चंद्रभागा शिंदे या दोघी याच गर्दीतल्या. शिवडीहून आलेल्या. बसने थेट कलानगरात उतरल्या. साहेबांसाठी कायपण करण्याची निष्ठा वयाच्या सत्तरीतही ठाम आहे. ‘‘शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला, मोर्चाला जातोय. पोरं, सुना विचारतात पण आम्ही थांबत नाही.
शिवडीत तेव्हा चांगले रस्ते नव्हते, पाणी नव्हते पण शिवसेनेमुळे चांगले रस्ते आले, पाणी मिळू लागले... या दोघी शिवसेनेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करीत होत्या. काहीही करून त्यांना शिवसेनाप्रमुखांना भेटायचे आहे. घरातून निघताना त्यांनी बिस्किटचे पुडे सोबत घेतलेत. पण मातोश्री बाहेरून हटण्यास त्या तयार नाहीत.