बाळासाहेबांचं स्मारक इंदूमिलमध्ये - मनसेची भूमिका

मनसेनं वेगळा पवित्रा घेत बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारलं जावं अशी मागणी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 22, 2012, 09:33 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक कुठे व्हावं आणि बाळासाहेबांचं नाव कशा-कशाला दिलं जावं, याबद्दलच्या वेगवेगळ्या मागण्या आता पुढे येत आहेत. त्यातच आता मनसेनं वेगळा पवित्रा घेत बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारलं जावं अशी मागणी केलीय.
शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कावरच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जावं, अशी मागणी शिवसेना रेटत असताना आणि या मागणीला राष्ट्रवादीनंही पाठिंबा दिला असताना मनसेनं मात्र वेगळी भूमिका घेतलीय. ‘शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यासाठी आमचा विरोध नाही. पण, बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी दादरची जागा अपुरी आहे. बाळासाहेब हे राजकारणी आणि समाजकारणीही होते. त्यांच्यासारख्या थोर एव्हढ्या थोर व्यक्तिमत्त्वाला साजेसं स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये मोठी जागा नाही. पण, इंदू मिलमध्ये असं मोठं स्मारक उभारलं जाऊ शकतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असं स्मारक दादरमध्ये नाही तर इंदू मिलमध्ये उभारलं जावं’ अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलीय. याचवेळी बाळासाहेबांच्या नावानं दादरमध्ये रुग्णालय व्हावं, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच, काँग्रेसच्या सुनील मोरेंनीही इंदू मिलमध्येच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जावं, असं म्हणत मनसेला पाठिंबाच दिलाय.
दरम्यान, दादर स्टेशनला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावं, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी केलीय तर शिवसेनेचे सभागृह नेते यशोधर फणसे यांनी शिवाजी पार्कातच बाळासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी मागणी केलीय. तसंच न्हावाशेवा-शिवडी सीलिंक आणि कोस्टल रोडलाही बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी त्यांनी मुंबई महापालिका सभागृहात केलीय.